जळगावताज्या बातम्या

रावेर तालुक्यात पुन्हा दमदार पाऊस; केर्‍हाळेत ८७ मिमीची नोंद

रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारीही अनेक भागांत जोरदार पावसाची हजेरी लागली. सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून काही सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

तालुक्यातील खानापूर, सावदा तसेच परिसरातील ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाला. यामध्ये केर्‍हाळे येथे सर्वाधिक ८७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली.

सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागला.

दुसरीकडे, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील पेरणी जवळपास अंतिम टप्प्यात आली असून, जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याने पिकांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button