ताज्या बातम्यासामाजिक

‘माहितीचा अधिकार दिवस’ २८ सप्टेंबरला; विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन

शाळा-महाविद्यालयांत प्रश्नमंजुषा, निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेणार

जळगाव (प्रतिनिधी) : नागरिकांमध्ये माहितीच्या अधिकाराबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘माहितीचा अधिकार दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ४ नुसार सार्वजनिक प्राधिकरणांनी संबंधित माहिती स्वयंस्फूर्तीने जनतेसाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता निर्माण व्हावी आणि नागरिकांना प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्र माहिती अधिकार अर्ज करण्याची आवश्यकता कमी व्हावी, यासाठी उपलब्ध माहिती संकेतस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध करण्याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये विविध स्पर्धा

शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीच्या अधिकारावर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यामध्ये प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्रे आणि व्याख्यानमालांचा समावेश असेल. या स्पर्धा २८ सप्टेंबरपूर्वी घेण्यात येणार असून २८ सप्टेंबर रोजी माहितीचा अधिकार दिवसाच्या निमित्ताने त्यांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

सामाजिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती

स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विविध अशासकीय आणि समाजसेवी संस्थांच्या सहकार्यानेही नागरिक, समाजकार्यकर्ते आणि इच्छुक गटांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

यामध्ये भिंतीपत्र स्पर्धा, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, चर्चासत्रे आणि व्याख्यानमाला यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर, नागरिकांचे अधिकार आणि शासकीय कामकाजातील पारदर्शकता याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

या उपक्रमांसाठी आवश्यक पारितोषिकांची व्यवस्था स्थानिक पातळीवर लायन्स क्लब, रोटरी क्लब तसेच विविध समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button