
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या निर्देशानुसार नाशिक विभागात नवीन सेवार्थ प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२६ देय सप्टेंबर २०२६ चे वेतन देयक नवीन प्रणालीद्वारे ई-देयक पद्धतीनेच सादर करावे लागणार आहे.
नवीन प्रणालीबाबत जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले असून, कार्यालयीन तसेच ऑनलाइन माध्यमातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२० ऑगस्टपासून जुनी प्रणाली बंद
२० ऑगस्ट २०२६ पासून जुनी सेवार्थ प्रणाली पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर जुन्या प्रणालीवर कोणतेही कामकाज करता येणार नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी मायग्रेशनसह आवश्यक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑगस्ट २०२६ देय सप्टेंबर २०२६ ची सर्व वेतन देयके नवीन सेवार्थ प्रणालीद्वारेच सादर करणे बंधनकारक राहणार आहे. याची सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.




