शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव (प्रतिनिधी) : देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव येथील महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विशेष आरोग्य तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन वीरमाता अनुसयाबाई शिंदे, वीरपत्नी, माजी सैनिक तसेच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली.
शिबिरात हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसह आवश्यक त्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. गरजेनुसार पुढील उपचार व वैद्यकीय मार्गदर्शनही देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सैनिक सेलचे सी. डी. पाटील, श्री. बडगुजर, जी. एम. फाउंडेशनचे उदय भालेराव, आरोग्यदूत पितांबर भावसार आणि वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर भारतमातेचे पूजन करून शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच उपस्थित वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांची जबाबदारी समाजाची
यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, “देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या सहकार्याने महादेव हॉस्पिटल सदैव तत्पर राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आवश्यक वैद्यकीय सेवा व योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
दरम्यान, ना. गिरीष भाऊ महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, उदय भालेराव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराचे समन्वयक म्हणून आरोग्यदूत पितांबर भावसार यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच महादेव हॉस्पिटलचे एन. जी. चौधरी, तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सैनिक सेलचे पदाधिकारी आणि शहीद जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या या उपक्रमातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या परिवाराप्रती समाजाची कृतज्ञता आणि बांधिलकी अधोरेखित झाली.



