
जळगाव (प्रतिनिधी) : सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या आवक लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दोन दरवाजे अंशतः उघडून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू केला आहे.
धरणातील जलसाठा सध्या सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, पाण्याची आवक कायम असल्याने परिस्थितीवर जलसंपदा विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नियोजनानुसार विसर्ग करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी धरण परिसरात चांगल्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, तापी नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीपात्रात अनावश्यक प्रवेश टाळावा, तसेच स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
जलसंपदा विभाग परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, पावसाची स्थिती आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.



