ताज्या बातम्यामहाराष्ट्र

२१ ऑगस्टला राज्यभर ‘महा वॉकथॉन’; मृद व जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविण्याचे आवाहन

‘वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमासह सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ‘महा वॉकथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते वॉकथॉनच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. राज्यातील युवक-युवती तसेच नागरिकांनी जलसंधारणाच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

२१ ऑगस्ट हा माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला व्यापक दिशा देणाऱ्या त्यांच्या योगदानाचे स्मरण करून यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यंदाच्या जलसंधारण दिनाची संकल्पना ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ अशी आहे.

१५ ऑगस्टपासून जलसंधारण सप्ताह

राज्यात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मृद व जलसंधारण, पाणी बचत, भूजल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नदी-ओढ्यांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

यानंतरही या उपक्रमांना सातत्य देत २६ जानेवारी २०२७ पर्यंत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून जलसंधारणाला व्यापक चळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

राज्यभर ३ किमी ‘महा वॉकथॉन’

२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ३ किलोमीटरची स्पर्धात्मक महा वॉकथॉन घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान १० हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित असून, राज्यभरातून ३ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी होतील, असे नियोजन आहे.

वॉकथॉनसाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करता येणार असून पात्र सहभागी नागरिकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी नागरिकांना जलसंधारणाच्या कामाशी जोडण्यासाठी त्यांना ‘जलदूत’ म्हणून ओळख देण्याची संकल्पना आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी नागरिकांकडून सामूहिक मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे.

माती आणि पाण्याचे संवर्धन, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आणि जलसंधारणातील लोकसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मंत्री संजय राठोड म्हणाले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्त्व ओळखून महा वॉकथॉनमध्ये सहभागी व्हावे आणि जलसंधारणाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा.

विजेत्यांना आकर्षक बक्षिसे

जिल्हास्तरीय महा वॉकथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे प्रस्तावित आहेत.

  • प्रथम क्रमांक : ₹२५ हजार व गौरवचिन्ह
  • द्वितीय क्रमांक : ₹१५ हजार व गौरवचिन्ह
  • तृतीय क्रमांक : ₹११ हजार व गौरवचिन्ह

याशिवाय सहभागी नागरिकांसाठी भाग्यवान सोडतीद्वारे विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. प्रायोजक किंवा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सहभाग मिळाल्यास आणखी आकर्षक पुरस्कारांचा समावेश केला जाऊ शकतो.

युवकांसाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’

जलसंधारणाचा संदेश डिजिटल माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ ही स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. १५ ते ३० वयोगटातील युवक-युवती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

मृद व जलसंधारणाचा संदेश देणारी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करून या स्पर्धेत सहभागी होता येईल. यासाठी राज्यभर #SaveSoilSaveWater हा अधिकृत हॅशटॅग वापरण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात किमान २५० रील्स आणि संपूर्ण राज्यात १० हजार रील्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय रील स्पर्धेतील पुरस्कार :

  • प्रथम क्रमांक : ₹२५ हजार व गौरवचिन्ह
  • द्वितीय क्रमांक : ₹१५ हजार व गौरवचिन्ह
  • तृतीय क्रमांक : ₹१० हजार व गौरवचिन्ह

पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.

शासनाच्या जलसंधारण कामांचीही माहिती

जलसंधारण सप्ताह आणि महा वॉकथॉनच्या माध्यमातून शासनाच्या विविध मृद व जलसंधारण योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० यांसह विविध योजनांचा समावेश आहे.

विविध घटकांचा सहभाग

या राज्यव्यापी अभियानात लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, क्रीडा संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योग क्षेत्र, खेळाडू, कलाकार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सामान्य नागरिक सहभागी होणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय करण्यात येणार आहे. मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कलाकारांच्या सहभागाचे नियोजन आहे.

माती आणि पाणी ही पुढील पिढीची संपत्ती आहे. त्यामुळे महा वॉकथॉनमध्ये सहभागी होऊन, रील स्पर्धेत सहभाग नोंदवून आणि जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button