काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचवूया – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ अभियानासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र व्यसनाधीनतेमुळे युवकांचे आरोग्य, कुटुंब आणि सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ या अभियानाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी शासनासोबतच प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक व धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, पालक आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. काशीमधून दिला जाणारा नशामुक्तीचा संदेश जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि युवकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
‘नशामुक्त युवा–विकसित भारत संकल्प अभियान’ाच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, कर्नल श्री. मिनोत्रा, युथ आयकॉन सोनिया देशमुख, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्यासह विविध संस्था व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी देशाची युवा पिढी निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे. युवकांचा अधिकाधिक सहभाग घेऊन गावागावात व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली पाहिजे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू, गुटखा तसेच अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. काशीतील नशामुक्तीचा संदेश जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
युवकांनी सकारात्मक उपक्रमांकडे वळावे – संजय सावकारे
युवकांची ऊर्जा योग्य दिशेने वापरण्यासाठी क्रीडा, व्यायाम, वाचन, कला, कौशल्य विकास आणि सामाजिक कार्य यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. युवकांनी सकारात्मक छंद अंगीकारावेत आणि मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा विधायक वापर करावा, असे मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.
देशासाठी बलिदान देणारे सैनिक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले पाहिजेत. व्यसनमुक्तीची जबाबदारी केवळ शासन किंवा पोलीस यंत्रणेपुरती मर्यादित नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रेम आणि समुपदेशनातून व्यसनमुक्तीचा मार्ग – स्वामी जनार्दन हरी जी महाराज
व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला समाजापासून दूर करण्याऐवजी त्याला प्रेम, आपुलकी आणि मानसिक आधार देऊन योग्य समुपदेशन करणे महत्त्वाचे आहे. संत-महंत, कीर्तनकार आणि प्रवचनकारांनी आपल्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण भागात व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करावी, असे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज यांनी सांगितले.
युवकांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज
आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, रिकामा वेळ आणि चुकीची संगत यामुळे युवक व्यसनाच्या मार्गावर जाऊ शकतात. त्यामुळे युवकांना शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास, रोजगार, व्यवसाय तसेच सामाजिक कार्याच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कुटुंब, समाज आणि प्रशासनाने युवकांना योग्य मार्गदर्शन देऊन सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असे त्यांनी आवाहन केले.
जनजागृतीपासून पुनर्वसनापर्यंत प्रभावी नियोजन
जळगाव जिल्ह्यात व्यसनमुक्ती अभियान प्रभावी करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन या चारही स्तरांवर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या माध्यमातून ‘व्यसनमुक्त जळगाव जिल्हा, विकसित जळगाव जिल्हा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली. अभियानाच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचे नियोजन युथ आयकॉन सोनिया देशमुख यांनी सादर केले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राईस’ व्यसनमुक्ती कार्यक्रमाची माहिती दिली.




