
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव (प्रतिनिधी) : काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असून, विद्यमान कायदे व नियमांचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. यासाठी विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून, ही समिती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि विविध घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
नाशिक येथील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक छळाच्या प्रकरणाबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारीवर तत्काळ कारवाई न केल्याच्या आरोपावरून संबंधित व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप करण्यात आले आहेत. संपूर्ण चौकशी प्रक्रियेत टीसीएस कंपनीने सहकार्य केले असून, कंपनीचा या घटनेत थेट सहभाग आढळून आलेला नाही. राज्य शासनाने सुचविलेल्या उपाययोजना राबविण्याची तयारी कंपनीने दर्शविली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
एका घटनेच्या आधारे टीसीएससारख्या देशातील अग्रगण्य आयटी कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. आयटी क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात तसेच रोजगारनिर्मितीत कंपनीचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौकशी जवळपास पूर्ण केली असून, त्याच्या अहवालाच्या आधारे नऊ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सर्व प्रकरणांतील आरोपपत्रे दाखल झाल्यानंतर अंतिम निष्कर्ष स्पष्ट होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, सदस्य मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या सोलापूर येथील शासकीय आयटीआयमधील तक्रारीची तातडीने चौकशी करण्यात येईल. तसेच तळेगाव दाभाडे येथील एका परदेशी कंपनीविरोधातील तक्रारीची १५ दिवसांत वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर आवश्यक कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.



