ताज्या बातम्याजळगाव

पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरालगत पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचल्याच्या घटनेची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांकडून पुलाच्या संरचनेला झालेल्या नुकसानीचा, पावसाच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत, आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबरच पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.

पाहणीदरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुलाच्या स्थितीची माहिती दिली. पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ पथक पाठवावे, नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करावी, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करावीत आणि नागरिकांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुलाच्या परिसरातील सद्यस्थिती, वाहतुकीवरील परिणाम तसेच प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button