
जळगाव (प्रतिनिधी): वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत अजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचे निश्चित केले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, धरणातून सुमारे १५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीपात्रात करण्यात येणार आहे. या पाण्यामुळे धरणगाव तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. कल्याण खुर्द, वाघळूद, चावलखेडा, पिंपळेसीम, भोद बु., हणमंतखेडे खु., पिंप्री खुर्द, कल्याणेहोळ, भोद खुर्द, हिंगोणे खुर्द आणि सतखेडा या गावांना या आवर्तनाचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पाण्यासाठी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने हे पाणी केवळ पिण्याच्या उद्देशासाठी राखीव असल्याचे स्पष्ट करत नदीकाठील शेतकऱ्यांनी मोटारपंप बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
तसेच नदीपात्र परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले. पाण्याचा अपव्यय टाळून जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
ग्रामीण भागातील पाणीप्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.




