रावेर तालुक्यात ७५ दिवसांत ५५ दिवस पावसाचा खंड; १२० गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू

रावेर (प्रतिनिधी): तालुक्यातील पाच सिंचन प्रकल्प यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला भरून वाहिले. पर्जन्यमानाची एकूण आकडेवारीही समाधानकारक दिसत असली, तरी पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. जुलैच्या उत्तरार्धापासून सप्टेंबरअखेरपर्यंत तब्बल ७५ दिवसांच्या कालावधीत सुमारे ५५ दिवस पाऊस न झाल्याने २३ हजार १८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे सुकी, मँगरूळ, आभोडा, गंगापुरी आणि मात्राण हे पाचही सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. काही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्गही झाला. मात्र, त्यानंतर पावसाने मोठा खंड घेतल्याने सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा पिकांना अपेक्षित फायदा मिळाला नाही.
काही भागात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांच्या काठावरील शेतजमिनीचे नुकसान झाले. बांध फुटणे, माती वाहून जाणे आणि पिकांवर गाळ साचणे अशा समस्यांनाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर दीर्घकाळ पाऊस न झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.
पिकांची वाढ खुंटली
जुलैच्या उत्तरार्धापासून सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक भागात पिकांना आवश्यक ओलावा मिळाला नाही. उपलब्ध माहितीनुसार काही भागात पावसाची तूट मोठ्या प्रमाणात नोंदली गेली आहे.
पाण्याअभावी तूर, मका, कापूस, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, उडीद आणि मूग या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पिके अपेक्षित उंची गाठण्यापूर्वीच फुलोऱ्यात आली. मक्याच्या कणसात दाणे भरण्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
कापसामध्ये फुलपात्या गळण्याचे प्रमाण वाढले असून तूर आणि इतर पिकांवरही प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. पावसाअभावी वाढलेले तापमान आणि त्यासोबत रसशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आह
केळी उत्पादकांनाही दुहेरी फटका
मेअखेर आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे वाढलेल्या उष्णतेचा केळी पिकावर परिणाम झाला.
काही कापणीयोग्य बागांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला, तर नवीन लागवडीतील केळीवर रसशोषक किडींसह कुकुंबर मोझॅक व्हायरसचा परिणाम वाढल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पावसाच्या खंडामुळे केळी उत्पादक तसेच खरीप शेतकरी दोन्ही अडचणीत आले आहेत.
१२० गावांमध्ये पंचनामे
तालुक्यातील १२० गावांमध्ये नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुमारे २३ हजार १८५ हेक्टर क्षेत्राचे जीओ-टॅग छायाचित्रांसह प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात येणार आहेत.
तहसीलदार संजय तायडे, कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके आणि गटविकास अधिकारी विनोद मेढे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची मदतीची मागणी
खानापूर येथील शेतकरी प्रकाश शेठी यांनी सांगितले की, सुरुवातीच्या अनियमित पावसामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पाऊस लांबल्याने दुबार पेरणी केलेल्या मक्याची वाढही समाधानकारक झाली नाही. सात एकर क्षेत्रातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पुरेशी आर्थिक मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
सहस्रलिंग येथील शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्या मते, सुरुवातीच्या पावसामुळे खरीप हंगाम चांगला जाण्याची अपेक्षा होती. मात्र, नंतर पावसाने दडी मारल्याने आणि तापमान वाढल्याने सातपुड्याच्या परिसरातील अनेक खरीप पिकांना फुलोऱ्याच्या अवस्थेतच मोठा फटका बसला.
शेतकऱ्यांचे लक्ष आता पंचनाम्यांकडे
अतिवृष्टी, पावसातील मोठा खंड आणि वाढते तापमान या तिन्ही कारणांमुळे यंदाचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून कोणती मदत जाहीर होते, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




