जळगावताज्या बातम्या

भूजल पातळी घटल्याने रावेर तालुक्यातील केळी उत्पादक अडचणीत

४५ अंश तापमानाचा परिणाम : विहिरींचा जलसाठा कमी, केळी पिकांना धोका

रावेर (प्रतिनिधी): तालुक्याच्या पूर्व भागात वाढत्या उष्णतेमुळे आणि सतत कमी होत चाललेल्या भूजल पातळीमुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ४५ अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून अनेक ठिकाणी विहिरींचा उपसा कमी झाला आहे.

याचा थेट परिणाम केळी बागांच्या सिंचनावर होत आहे. अनेक शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून काही ठिकाणी केळीची झाडे करपू लागल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पातून मर्यादित स्वरूपात पाणीपुरवठा सुरू असला तरी तो अपुरा ठरत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दुसरे आवर्तन मिळण्याबाबतही अनिश्चितता असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

शेतकरी व कृषी तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत पावसाची परिस्थिती सुधारली नाही तर रावेर तालुक्यातील केळी उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button