रसलपूर शिवारातील नालेसफाईला वेग; पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी कारवाई

रावेर (प्रतिनिधी): रावेर शहरालगतच्या रसलपूर शिवारात पावसाळ्यात निर्माण होणारी पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन नालेसफाईच्या कामाला गती देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या पुढाकारातून जेसीबीच्या साहाय्याने गाळ, झुडपे व अडथळे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.
अलीकडील मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक, व्यायामशाळा चौक, विवेक चौक तसेच पारोचा गणपती मंदिर परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. याची दखल घेत संबंधित विभागाने तातडीने नालेसफाईची मोहीम हाती घेतली.
नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आणि झुडपे वाढल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात होता. जेसीबीच्या साहाय्याने नाल्यांचे खोलीकरण व स्वच्छता करण्यात येत असून पावसाचे पाणी जलदगतीने वाहून जाण्यास मदत होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पावसाळ्यात पूरस्थिती टाळण्यासाठी अशा प्रकारची नियमित नालेसफाई करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनानेही भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येतील, असे सांगितले आहे.



