जळगावताज्या बातम्या

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्समध्ये भक्तिभावाने स्वागत

जळगाव (प्रतिनिधी): जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री संत मुक्ताबाई रामपालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यानंतर जैन हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायातील भाविकांचेही उत्साहात स्वागत करण्यात आले.

अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी संत मुक्ताबाईंच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. तसेच जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी विजय मुथा यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी व सत्कार करून स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी एस. बी. ठाकरे, चंद्रकांत चौधरी, भीमराव दांडगे आणि किशोर पाटील यांनी श्रीराम मंदिर संस्थान (आप्पा महाराज समाधी मंदिर) चे विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांचे स्वागत करून सेवा केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडतर्फे संत मुक्ताबाई रामपालखीच्या सेवेसाठी एक मालवाहू वाहन आणि सज्ज प्रवासी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. ही वाहने संपूर्ण वारीदरम्यान वारकऱ्यांसोबत पंढरपूरपर्यंत प्रवास करतात.

सन १७९४ मध्ये सुरू झालेल्या या ऐतिहासिक पालखी सोहळ्याची परंपरा अखंडपणे सुरू असून, दरवर्षी पंढरपूरकडे जाताना जैन हिल्स येथे पालखीचे स्वागत केले जाते. स्वागतानंतर ह.भ.प. श्रीराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो वारकऱ्यांसह पालखीने पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला.

यावेळी जी. आर. पाटील, मनोहर बागुल, सुनील खैरनार, अभिजित शुक्ला, नितीन चोपडा आणि श्रेयस कुमट यांच्यासह श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

जैन इरिगेशनतर्फे वारीत सहभागी वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन इरिगेशनच्या मानव संसाधन, सुरक्षा आणि राजभोज खानपान विभागातील सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button