जळगावताज्या बातम्याधार्मिक

नर्मदा परिक्रमा पूर्ण करून संत श्री गोपाल चैतन्य महाराजांचे पाल येथे भाविकांतर्फे उत्साहात स्वागत

रावेर (प्रतिनिधी): अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे कृपापात्र शिष्य तथा अखिल भारतीय संत समितीचे प्रदेशाध्यक्ष संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांनी १०८ चैतन्य साधक परिवारातील साधकांसह पवित्र नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर पाल येथे त्यांच्या आगमनानिमित्त भाविकांतर्फे भक्तिभावाने व जल्लोषात स्वागत करण्यात आले.

संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांनी अवघ्या १०८ दिवसांत सुमारे ३,५०० किलोमीटर अंतराची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमा पूर्ण करून ते पाल येथील श्रीवृंदावन धाम आश्रमात दाखल होताच चैतन्य युवा उत्सव समिती व भाविकांनी त्यांचे पुष्पहार, जयघोष आणि भक्तिगीतांच्या गजरात स्वागत केले.

सायंकाळी पाच वाजता पाल गावातून शेरीनाका परिसरात हरीनाम संकीर्तनासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भक्तिगीत, टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. त्यानंतर पाल आश्रमातील श्री हरिधाम मंदिरात विराजमान असलेल्या संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधीस्थळी संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांनी दर्शन घेतले.

समाधी दर्शनानंतर मंचावर आगमन होताच भाविकांनी त्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत केले. यावेळी संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांनी नर्मदा परिक्रमेतील अनुभव कथन करत परिक्रमेचे आध्यात्मिक महत्त्व, साधना, संयम आणि भक्तीचे महत्त्व विशद केले. त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविक भावविभोर झाले.

या कार्यक्रमात गोविंद पवार व राधे पवार यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास योगी महाराज, श्याम चैतन्य महाराज, दिव्य चैतन्य महाराज, शिव चैतन्य महाराज, नवनीत चैतन्य महाराज, हरीश चैतन्य महाराज, ऋषी चैतन्य महाराज, शुभ चैतन्य महाराज, श्रीराम चैतन्य महाराज, ललित चैतन्य महाराज यांच्यासह परिसरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नर्मदा परिक्रमेच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त पाल येथे झालेल्या या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button