जळगावताज्या बातम्याधार्मिकसामाजिक

परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या ५८व्या अवतरण दिनानिमित्त पाल वृंदावन धाम आश्रमात विविध कार्यक्रम

१५ ऑगस्ट रोजी पूजन, अभिषेक, भक्ती फेरी, सत्संग व महाआरतीचे आयोजन

पाल, ता. रावेर : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री वृंदावन धाम आश्रमाचे संस्थापक आणि अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे सद्गुरू परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या ५८व्या अवतरण दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पाल वृंदावन धाम आश्रमात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आश्रमाचे विद्यमान गादीपती श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य साधक परिवार समितीतर्फे हा कार्यक्रम होणार आहे.

परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचा जन्म १५ ऑगस्ट १९६८ रोजी पाल येथे झाला. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी त्यांनी कौटुंबिक जीवनाचा त्याग करून अध्यात्मिक साधनेचा मार्ग स्वीकारला. सन १९८२ मध्ये पालजवळील एका निर्जन टेकडीवर त्यांनी साधना सुरू केली. अखंड ब्रह्मचर्य, भक्ती, वैराग्य आणि कठोर साधनेत त्यांनी आपले जीवन व्यतीत केले.

बापूजींनी दीर्घकाळ उपवास व मौन साधना केल्याचे त्यांच्या अनुयायांकडून सांगितले जाते. पुढे त्यांनी अध्यात्मिक मार्गदर्शनातून समाजात व्यसनमुक्ती, सात्त्विक जीवन, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. सन २००२ मध्ये अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराची स्थापना करून देशभरातील भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन देण्याचे कार्य त्यांनी सुरू केले.

पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रम हे त्यांच्या कार्याचे प्रमुख केंद्र बनले. येथे अखंड हरिनाम संकीर्तन, श्रीहरी गोपाल गौशाळा, वृद्धाश्रम, निःशुल्क आरोग्य केंद्र, सांदिपनी गुरुकुल, अध्यात्मिक साहित्य भांडार, पौर्णिमा सत्संग, भोजनालय आणि विविध धार्मिक उपक्रम सुरू करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनातून देशातील विविध भागांत भक्तीसभा व ध्यान केंद्रेही निर्माण झाली.

परमपूज्य बापूजी २५ डिसेंबर २००९ रोजी ब्रह्मलीन झाले. त्यांच्या पश्चात श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पालसह चारुकेश्वर, आंबा, कन्नड आणि हरसूद येथील आश्रमांमध्ये बापूजींच्या संकल्पनेनुसार विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम सुरू आहेत.

अवतरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

१५ ऑगस्ट रोजी सकाळी श्री हरिधाम मंदिरातील समाधीस्थळी पूजन, अभिषेक व आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता हरिनामाच्या गजरात पाल गावातून भक्ती फेरी काढण्यात येणार आहे.

भक्ती फेरीनंतर सामूहिक प्रार्थना, श्रीमद्भगवद्गीतेचे पठण, सत्संग, श्रद्धावचन आणि महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत.

या धार्मिक व आध्यात्मिक महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चैतन्य साधक परिवार, वृंदावन धाम पाल समिती यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button