ताज्या बातम्यापुरस्कारसामाजिक

राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्रातील १० कलावंतांचा राष्ट्रीय सन्मान; संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककलेतील योगदानाची दखल

भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील १० कलावंतांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन येथे २०२४ आणि २०२५ या वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्याला केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह, संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कलावंतांचा गौरव

२०२४ च्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहा कलावंतांचा समावेश आहे. अरुण कशाळकर यांना हिंदुस्तानी शास्त्रीय गायन, आनंद भाटे यांना अभंग गायन, अरुण नलावडे यांना अभिनय, मुकुंद मराठे यांना पारंपरिक रंगभूमी, सुभाष नारायण नकाशे यांना लोकनृत्य आणि शुभदा वरदकर यांना नृत्य संशोधनासाठी पुरस्कार मिळाला.

२०२५ च्या पुरस्कारांमध्ये शैलेश भागवत यांना शहनाई वादन, प्रमोद डी. पवार यांना दिग्दर्शन, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना नाट्यसंगीत आणि मनीषा साठे यांना कथक नृत्यासाठी सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, ताम्रपत्र आणि शाल असे आहे.

भारतीय कलेच्या संवर्धनाला बळ

सन १९५२ पासून प्रदान करण्यात येणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा भारतीय संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सन्मान मानला जातो. दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय कलासाधनेची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जाते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व पुरस्कारविजेत्या कलावंतांचे अभिनंदन केले. भारतीय कला आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यात कलाकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button