
जलसंधारण दिनानिमित्त ३ किलोमीटर चालण्यासह मृद व जलसंधारणाची शपथ; राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजन
मुंबई : शाश्वत विकासासाठी माती आणि पाण्याचे संवर्धन हा महत्त्वाचा विषय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकारातून होणाऱ्या या उपक्रमाची थीम ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येणार आहे.
वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिकांना कमाल ३ किलोमीटरपर्यंत चालणे आणि त्यानंतर मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेणे अपेक्षित आहे. जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
१५ ऑगस्टपासून जलसंधारण सप्ताह
राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी
‘महा वॉकेथॉन’साठी क्यूआर कोड आधारित ऑनलाइन नोंदणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र दिले जाणार असून, जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्याचे नियोजन आहे. सोशल मीडियावर #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१५ ते ३० वयोगटासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर’
जलसंधारण सप्ताहात राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘Reel for Soil and Water Conservation’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करून ती आपल्या सार्वजनिक Instagram खात्यावर पोस्ट करायची आहे.
रीलमध्ये माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, पावसाचे पाणी साठवण, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण उपायांपैकी विषय मांडता येणार आहेत.
Storytelling, Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Before-After आणि Drone Visuals अशा विविध सर्जनशील माध्यमांचा वापर करता येईल. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक राहील.
१०० गुणांवर स्पर्धेचे मूल्यांकन
रील स्पर्धेत विषय व संदेशासाठी ३०, कल्पकतेसाठी २५, सामाजिक संदेशासाठी २०, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्तेसाठी १५ आणि Instagram Engagementसाठी १०, असे एकूण १०० गुण असतील. केवळ Likes किंवा Followersच्या संख्येवर विजेते निश्चित न करता तज्ज्ञांचे परीक्षण आणि सोशल मीडिया सहभाग या दोन्हींचा विचार केला जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्स, तर संपूर्ण राज्यातून १० हजार रील्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ₹२५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ₹१० हजार पुरस्कार व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. पात्र सहभागीांना ई-प्रमाणपत्र, तर विजेत्यांना ‘युवा मृद-जलदूत’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.
शाळा-महाविद्यालयांतही विविध उपक्रम
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, पोस्टर, वाद-विवाद आणि जलसंधारण विषयक विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. ‘एक शाळा–एक शोषखड्डा’, पाणी बचतीबाबत जनजागृती, ‘जलमित्र’ किंवा ‘जलदूत’ उपक्रम यांसारख्या कार्यक्रमांवरही भर दिला जाणार आहे.
२१ ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारणाची शपथ, तसेच विविध ठिकाणी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम आयोजित केले जातील. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
“एक Reel… मातीसाठी! एक Reel… पाण्यासाठी! एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी!” या संदेशातून जलसंधारणाची जनजागृती व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.



