
जळगाव (प्रतिनिधी): स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत केंद्र सरकारने महावितरणला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यानुसार, तक्रार नोंदविणाऱ्या ग्राहकांच्या ठिकाणी तीन महिन्यांसाठी समांतर ‘चेक मीटर’ बसवून रीडिंगची तुलना करण्यात येणार आहे. या प्रक्रियेद्वारे स्मार्ट मीटरच्या अचूकतेची पडताळणी केली जाणार आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, चेक मीटर बसविण्याचा संपूर्ण खर्च कंपनीकडून करण्यात येणार असून ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तीन महिन्यांच्या कालावधीत स्मार्ट मीटर आणि चेक मीटरच्या रीडिंगची तुलना करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल.
तपासणीत स्मार्ट मीटरमध्ये तांत्रिक त्रुटी किंवा चुकीचे बिलिंग आढळल्यास नियमानुसार आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. ग्राहकांच्या विश्वासार्हतेसाठी आणि पारदर्शकतेसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
तपासणीची प्रक्रिया
- स्मार्ट मीटरबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणी चेक मीटर बसविण्यात येईल.
- सलग तीन महिने दोन्ही मीटरचे रीडिंग नोंदवून तुलना केली जाईल.
- तपासणी अहवालाच्या आधारे स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात येईल.
- आवश्यक असल्यास संबंधित मीटर बदलणे किंवा बिलामध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही केली जाईल.
जळगाव जिल्ह्यातील स्थिती
महावितरणने जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख २५ हजार ७०७ स्मार्ट मीटर बसविले असून, उर्वरित ग्राहकांकडेही टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महावितरणने ग्राहकांना मीटरबाबत कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास अधिकृत माध्यमातून तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.



