क्रीडाताज्या बातम्या

राज्य सरकारचा खेळाडूंना मोठा आर्थिक ‘बूस्टर’; सुवर्णपदक विजेत्यांना मिळणार ५ कोटींचे बक्षीस

ऑलिम्पिकसह आशियाई, राष्ट्रकुल, जागतिक अजिंक्यपद आणि राष्ट्रीय स्पर्धांतील पदक विजेत्यांसाठी सुधारित पारितोषिक योजना

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने सुधारित क्रीडा पारितोषिक योजना जाहीर केली आहे. वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना अधिक आर्थिक पाठबळ मिळावे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या योजनेमागील उद्देश आहे.

या नव्या योजनेनुसार ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूला तब्बल ५ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ३ कोटी रुपये, तर कांस्यपदकासाठी २ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांसाठी मोठी रक्कम

सुधारित योजनेत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी सर्वाधिक पारितोषिकाची तरतूद करण्यात आली आहे.

स्पर्धासुवर्णरौप्यकांस्य
ऑलिम्पिक₹५ कोटी₹३ कोटी₹२ कोटी
आशियाई क्रीडा स्पर्धा₹१ कोटी₹७५ लाख₹५० लाख
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा₹१ कोटी₹७५ लाख₹५० लाख
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा₹६ लाख₹५ लाख₹३ लाख
खेलो इंडिया₹३ लाख₹२ लाख₹१ लाख

यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार भरीव आर्थिक पुरस्कार मिळणार आहे.

पॅरा खेळाडूंसाठीही स्वतंत्र तरतूद

दिव्यांग खेळाडूंच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी पॅरा ऑलिम्पिक आणि पॅरा आशियाई स्पर्धांसाठीही विशेष पारितोषिकाची तरतूद करण्यात आली आहे.

पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूला ५ कोटी रुपये, रौप्यपदकासाठी ३ कोटी आणि कांस्यपदकासाठी २ कोटी रुपये देण्यात येतील. पॅरा आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्यांसाठीही सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकानुसार अनुक्रमे १ कोटी, ७५ लाख आणि ५० लाख रुपये देण्याची तरतूद आहे.

याशिवाय विशेष ऑलिम्पिक, अर्धक्रिकेट विश्वचषक आणि इतर पात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठीही स्वतंत्र पारितोषिकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

जागतिक स्पर्धांतील पदक विजेत्यांनाही मोठे बक्षीस

चार वर्षांतून एकदा होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद किंवा विश्वचषक स्पर्धांमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंनाही भरीव आर्थिक पुरस्कार मिळणार आहे.

या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकासाठी ५ कोटी रुपये, रौप्यपदकासाठी ३ कोटी आणि कांस्यपदकासाठी २ कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या स्पर्धांसाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाख रुपये देण्यात येतील. वार्षिक स्पर्धांसाठी अनुक्रमे २५ लाख, २० लाख आणि १५ लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

युवा आणि ज्युनियर खेळाडूंनाही प्रोत्साहन

भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी युवा आणि ज्युनियर स्तरावरील स्पर्धांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे.

युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्यास ३० लाख रुपये, तर रौप्य आणि कांस्यपदकासाठी अनुक्रमे ३० लाख आणि २० लाख रुपयांची तरतूद आहे. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना अनुक्रमे १० लाख, ७ लाख आणि ५ लाख रुपये, तर ज्युनियर एशियन चॅम्पियनशिपसाठी ५ लाख, ३ लाख आणि २ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

प्रशिक्षकांचाही गौरव

खेळाडूच्या यशामागे प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रशिक्षकांनाही आर्थिक पुरस्कारात वाटा देण्यात येणार आहे.

खेळाडूला मिळणाऱ्या पारितोषिकाच्या रकमेपैकी सराव स्तरावरील प्रशिक्षकाला ३० टक्के, विकासात्मक स्तरावरील प्रशिक्षकाला ३० टक्के आणि उच्चस्तरीय प्रशिक्षकाला ४० टक्के या प्रमाणात वाटप केले जाणार आहे.

खेळाडूंच्या मेहनतीला आर्थिक पाठबळ

नव्या योजनेमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धा आणि पॅरा क्रीडा क्षेत्रातील पदक विजेत्यांसाठी वाढविण्यात आलेली पारितोषिकाची रक्कम महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button