भुसावळमध्ये तिरंगा रॅलीतून कारगिल वीरांना मानवंदना; ५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी): कारगिल विजय दिनानिमित्त भुसावळ शहरात विजयाणी एज्युकेशन ग्रुप यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीची भावना जागविण्यासाठी आयोजित या रॅलीत सुमारे ५०० विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कारगिल युद्धातील शहीद वीरांना अभिवादन केले.
रॅलीची सुरुवात शहरातील पोलीस स्टेशन परिसरातून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणांनी परिसर देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून टाकला.
यावेळी कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाला विजयाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज विजयाणी, सचिव विजय विजयाणी, उपाध्यक्ष विनोद विजयाणी, रोशन विजयाणी, आयुषी विजयाणी, मनीष विजयाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी पिंटू कोतारी यांनी सहकार्य केले. तसेच गौरीनाथ पिंगळे, गजानन तळोरे, प्रशांत तावडे, प्रीती पाटील, बबलू खंडे, संगीता तांबे, संदीप सुरवाडे तसेच इतर शिक्षक व कर्मचारी यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.




