
जळगाव (प्रतिनिधी): जागतिक स्तरावर उद्भवणाऱ्या पुरवठा साखळीतील अडचणी, भूराजकीय तणाव किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत देशातील इंधनपुरवठा अखंडित राहावा, यासाठी केंद्र सरकारने सामरिक कच्च्या तेलाच्या साठवण क्षमतेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारासाठी १८,५२७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, ओडिशा आणि कर्नाटकमध्ये एकूण ६५ लाख टन अतिरिक्त साठवण क्षमता उभारली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत ओडिशामध्ये ४० लाख टन आणि कर्नाटकमध्ये २५ लाख टन क्षमतेचे सामरिक तेलसाठे उभारले जातील. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणार असून, यासाठी १८,५२७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.
सध्या देशात विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पाडूर येथे मिळून ९.३३ लाख टन क्षमतेचे सामरिक तेलसाठे उपलब्ध आहेत. हे साठे २०१८ ते २०१९ या कालावधीत कार्यान्वित करण्यात आले. नव्या प्रकल्पानंतर देशाची सामरिक साठवण क्षमता लक्षणीय वाढणार आहे.
केंद्र सरकारने कच्च्या तेलाच्या आपत्कालीन साठ्यासाठी परदेशातील भागीदारीही वाढविली आहे. यापूर्वी २७ लाख टन क्षमतेचा साठा उपलब्ध होता, तो वाढवून ५७ लाख टन करण्यात आला आहे.
सामरिक तेलसाठा म्हणजे काय?
सामरिक तेलसाठा म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने राखीव ठेवलेला कच्च्या तेलाचा साठा. जागतिक बाजारपेठेत पुरवठा खंडित होणे, युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक संकटामुळे आयातीत अडथळे निर्माण झाल्यास या साठ्याचा वापर करून देशातील इंधनपुरवठा सुरळीत ठेवला जातो.
प्रकल्पाची अंमलबजावणी
या विस्तार प्रकल्पाचा दुसरा टप्पा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) पद्धतीने राबविला जाणार आहे. १८,५२७ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेत सरकारसोबत खासगी क्षेत्राचाही सहभाग राहणार आहे.
अबुधाबीच्या कंपनीशी करार
इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेडने अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीसोबत करार केला असून, मंगळुरू येथील ०.९ लाख टन क्षमतेच्या सामरिक तेलसाठ्यात कच्चे तेल साठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.




