ताज्या बातम्या

शाळा प्रवेशोत्सव व नवीन शैक्षणिक वर्षाच्या पूर्वतयारीसाठी मुख्याध्यापकांची जिल्हास्तरीय सभा संपन्न

रावेर (प्रतिनिधी) : ला. ना. विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव पूर्वतयारी व नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंदर्भात सभा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सभेस उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, रागिणी चव्हाण, वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे. के. अण्णा पाटील आणि जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष डॉ. आर. डी. निकम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन रागिणी चव्हाण यांनी केले.

सभेच्या प्रारंभी डॉ. आर. डी. निकम यांनी शाळास्तरावरील विविध समित्यांच्या एकत्रीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांनी शाळास्तरावर जतन करावयाच्या विविध अभिलेखांबाबत तसेच अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांमधून अनुदानित शाळांमध्ये होणाऱ्या बदल्यांच्या नवीन कार्यपद्धतीबाबत माहिती दिली.

चंद्रकांत गवळी यांनी संच मान्यतेच्या प्रक्रियेत घ्यावयाची काळजी स्पष्ट केली. वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार यांनी पगार बिले सादर करताना आवश्यक दक्षतेबाबत मार्गदर्शन करत दर महिन्याच्या एक तारखेला पगार अदा करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले.

जे. के. अण्णा पाटील यांनी मुख्याध्यापकांनी शाळा प्रशासन यशस्वीपणे राबविण्यासाठी, विद्यार्थी सुरक्षिततेसाठी तसेच शासनाच्या नवीन अनुकंपा धोरणाबाबत आवश्यक बाबींची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापनाबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी शाळा प्रवेशोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. पुढील दोन दिवसांत शाळा व परिसर स्वच्छ ठेवणे, विद्यार्थी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे, पावसाळ्यात विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेणे तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, नवोदय, एनएमएस तसेच विज्ञान प्रदर्शन आणि इन्स्पायर अवॉर्डमध्ये अधिकाधिक शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत सर्व शाळांनी सहभाग घेऊन अमृतवृक्ष अ‍ॅपमध्ये नोंद करावी, असेही त्यांनी सांगितले.

जून-जुलै महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे नियोजन करावे. पुढील वर्षी गुणवत्तापूर्ण निकाल वाढविण्यासाठी जादा तासिका घेऊन विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिकांचा अधिकाधिक सराव करून घ्यावा. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर शंभर टक्के सीसीटीव्ही व्यवस्था उपलब्ध करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

सभेस मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आभार प्रदर्शन कल्पना चव्हाण यांनी केले. जिल्हाभरातील मोठ्या संख्येने मुख्याध्यापक या सभेला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button