
जळगाव (प्रतिनिधी): प्रीमियम पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण कमी करून ई-० किंवा ई-१० पेट्रोल पुन्हा बाजारात आणण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारसमोर विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याचे धोरण कायम राहणार असून, सध्या २० टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रणाबाबतही कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती सरकारने दिली.
लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले की, पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय वैज्ञानिक अभ्यास, तांत्रिक मूल्यमापन तसेच वाहन उत्पादक, इंधन कंपन्या आणि संबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच घेतला जातो. त्यामुळे सध्या ई-० किंवा ई-१० पेट्रोल पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
सरकारच्या माहितीनुसार, ई-२० पेट्रोल देशातील निवडक पेट्रोल पंपांवर उपलब्ध करून दिले जात असून, त्याबाबत ग्राहकांकडून कोणतीही व्यापक तक्रार प्राप्त झालेली नाही. वाहन उत्पादकांकडूनही ई-२० इंधनासाठी अनुकूल वाहनांची निर्मिती वाढविण्यात येत आहे.
सरकारने स्पष्ट केले की, इंधनामध्ये इथेनॉलचा वापर वाढवल्यामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी होण्यास, पर्यावरण संरक्षणास आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रण धोरणात मागे जाण्याची आवश्यकता नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.



