सहाय्यक इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणाची पहिली बॅच यशस्वी; निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

नंदुरबार (प्रतिनिधी) : येथील टीएमआय फाउंडेशन व इंडियन एक्झिम बँक यांच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सहाय्यक इलेक्ट्रिशियन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची पहिली बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. यानिमित्त प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर रोजगारासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या बॅचचे उद्घाटनही करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देत प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमास इंडियन एक्झिम बँकेचे मुख्य सीएसआर प्रमुख रेन्झडॉन रॉड्रिग्स, टीएमआय फाउंडेशनचे वरिष्ठ ऑपरेशन्स प्रमुख रवींद्र तसेच प्रकल्प व्यवस्थापक विकास उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



