जैन इरिगेशनचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल दमदार; उत्पन्नात १७.४ टक्क्यांची वाढ, EBITDA ₹१६८ कोटी

जळगाव (प्रतिनिधी): कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीचे (Q3 FY-26) तसेच पहिल्या नऊ महिन्यांचे (9M FY-26) एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले असून, कंपनीच्या उत्पन्नात १७.४ टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
कंपनीचे एकत्रित उत्पन्न ₹१,५९८ कोटींवर पोहोचले असून, EBITDA ₹१६८ कोटी इतका नोंदवण्यात आला आहे. या मजबूत कामगिरीमुळे बाजारात कंपनीच्या वाढीच्या क्षमतेबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सर्व व्यवसाय विभागांमध्ये दुहेरी अंकातील वाढ झाली आहे. अलीकडील GST दर कपातीमुळे मागणीला चालना मिळाली असून, त्याचा महसूल वाढीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच कार्यक्षम अंमलबजावणी आणि रोख शिस्तीमुळे कार्यभांडवल चक्रात सुधारणा होऊन ऑपरेशन्समधून मजबूत रोख प्रवाह निर्माण झाला आहे.
पहिल्या नऊ महिन्यांत महसुलात सातत्यपूर्ण वाढ दिसून आली असून, मार्जिनमध्येही सुधारणा झाली आहे. किरकोळ व्यवसायावर वाढलेला भर, कार्यक्षमता सुधारणा आणि खर्च नियंत्रण यामुळे हे सकारात्मक परिणाम साध्य झाल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा खर्चामुळे पाइपिंग व्यवसायाला गती मिळण्याची अपेक्षा असून, सौर कृषी पंप व ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या धोरणांमुळे भविष्यात मागणी वाढेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
दरम्यान, कंपनीच्या कृषी-प्रक्रिया विभागाने (JFFFL) एका नामांकित शीतपेय कंपनीसोबत नवीन प्रकल्पाचे काम सुरू केले असून, Q4FY26 पासून उत्पन्नात योगदान अपेक्षित आहे. तसेच टोमॅटो प्युरी उत्पादनासाठी एका आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही कंपनी शाश्वत वाढ आणि भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती करण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास अनिल जैन यांनी व्यक्त केला.




