
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 19 सप्टेंबरपासून काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता असून पुढील काही दिवस काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.
जळगावसह उत्तर महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज
जळगावच्या हवामान अंदाजानुसार 19 सप्टेंबरला ढगाळ वातावरणासह हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
20 ते 22 सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही 19 ते 22 सप्टेंबरदरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन
वादळी पावसाच्या काळात शेतकऱ्यांनी फवारणी, कापणी आणि इतर शेतीची कामे करताना स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबणे टाळावे.
टीप : जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज बदलू शकतो. त्यामुळे प्रवास किंवा शेतीची कामे करण्यापूर्वी हवामान विभागाचे ताजे अपडेट तपासणे महत्त्वाचे आहे.




