जागतिकताज्या बातम्या

जोरदार पावसामुळे धामोडीत पूरस्थिती; नाल्याकाठची घरे पाण्यात, नागरिकांची कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी

रावेर (प्रतिनिधी) : परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे धामोडी येथील नाल्याला मोठा पूर आला. नाल्याचे पाणी धोकादायक पातळीवर पोहोचल्याने नाल्याकाठील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे, घरगुती वस्तू तसेच इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले.

पूराच्या पाण्यामुळे नाल्याकाठील परिसर जलमय झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रत्येक पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाचा जोर वाढताच नाल्याचे पाणी थेट घरांमध्ये घुसत असल्याने जीवितहानीची भीती कायम असल्याचे नागरिकांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत उभारणे तसेच पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने दरवर्षी पुराच्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, पूरग्रस्त भागाची तातडीने पाहणी करण्यात यावी, नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, पंचनामे त्वरित करण्यात यावेत आणि नाल्याकाठील धोकादायक भागातील कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. भविष्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button