रावेर तालुक्यात वादळाचा कहर; ३३ हेक्टर केळीबागा जमीनदोस्त, कोटीहून अधिक नुकसान

रावेर, प्रतिनिधी : तालुक्यात रविवारी पहाटे आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अटवाडे, मोरगाव, खिरवड, रोझोदे, भोकरी, निंभोरा खुर्द, विवरे तसेच सावखेडा, अंजनाड, कुंभारखेडा आणि लोहरा परिसरातील केळीबागांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणीनुसार तालुक्यातील सुमारे ३३ हेक्टर क्षेत्रावरील केळीबागांचे नुकसान झाले असून ४८ शेतकरी बाधित झाले आहेत. या नुकसानीची अंदाजित रक्कम १ कोटी ८ लाख ७० हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. अटवाडे येथे ११.९० हेक्टर, खिरवड येथे ११ हेक्टर, विवरे येथे ८ हेक्टर, निंभोरा खुर्द येथे ३ हेक्टर तर रोझोदे येथे १.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीबागा वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या.
दरम्यान, सावखेडा परिसरातही वादळाचा मोठा फटका बसला. शेतकरी संदीप पाटील यांच्या शेतातील सुमारे ३५०० केळीचे खांब आणि १००० ते १५०० झाडे कोसळल्याची माहिती मिळाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.



