जळगावताज्या बातम्या

खिर्डी बुद्रुक ग्रामस्थांचे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बेमुदत उपोषण सुरू

रावेर (प्रतिनिधी): बसस्टँड ते जिल्हा परिषद शाळेदरम्यानचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने त्याच्या तातडीच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी खिर्डी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी २६ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

ग्रामस्थांनी यापूर्वी २६ जून आणि ३ जुलै रोजी प्रशासनाला लेखी निवेदने सादर केली होती. मात्र, त्यानंतरही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने उपोषण सुरू करण्यात आले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता गावातील शाळा, बसस्थानक, बाजारपेठ तसेच शेतकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

उपोषणकर्त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक ठिकाणी गटारी, खडीकरण, डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीट रस्ता उभारण्याची तसेच बसस्टँड ते रेल्वे स्थानकादरम्यानचा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

आंदोलनाला ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला समर्थन दर्शविले.

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने मंजुरी व प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button