
रावेर (प्रतिनिधी): एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानाचा परिणाम केळी पिकांवर जाणवू लागल्याने परिसरातील शेतकरी सावध झाले आहेत. तीव्र उन्हामुळे पानांवर करपण्याचे प्रमाण वाढत असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केळी बागांचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. बागांच्या सभोवती साड्या, शेडनेट तसेच इतर आच्छादनांचा वापर करून थेट उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, सतत वाढणारे तापमान आणि उष्ण वाऱ्यांमुळे केळी पिकाला ताण निर्माण होतो. त्यामुळे नियमित पाणी व्यवस्थापन, मल्चिंग आणि सावलीची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जात असून आवश्यक उपाय त्वरित राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी वेळेत काळजी घेतल्यास संभाव्य नुकसान कमी होऊ शकते, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली.



