जळगावसामाजिक

कडुलिंब नव्हे, ‘कर्टुली’चा हंगाम! दुर्गम भागातील आदिवासींना रोजगाराचा आधार

पाल, ता. रावेर | प्रतिनिधी:

पावसाळ्याच्या आगमनानंतर रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या ‘कर्टुली’ (रानभाजी) मुळे स्थानिक आदिवासी बांधवांना हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे. जंगल परिसरातून कर्टुली गोळा करून स्थानिक बाजारपेठेत विक्री केल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक हातभार लागत आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलातील वेलींवर कर्टुली मोठ्या प्रमाणात येते. सकाळच्या वेळी आदिवासी महिला व पुरुष जंगलात जाऊन कर्टुली तोडतात. त्यानंतर ती स्वच्छ करून गावातील तसेच शहरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणली जाते. पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या या वनउत्पादनामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुलभ होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

कर्टुलीसोबतच जंगलात उपलब्ध होणाऱ्या फांगाची पाने (फांगाची भाजी) यांनाही बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे पावसाळ्यात जंगलातील या नैसर्गिक उत्पादनांमधून आदिवासी बांधवांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते.

सध्या स्थानिक बाजारात कर्टुलीची विक्री प्रति किलो सुमारे १५० ते २०० रुपये दराने होत आहे. चव आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे ग्राहकांकडून ताज्या कर्टुलीला विशेष पसंती मिळत आहे. यामुळे जंगलावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना हंगामी रोजगारासोबतच आर्थिक दिलासाही मिळत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, वनउत्पादनांना योग्य बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि शासकीय प्रोत्साहन मिळाल्यास अशा नैसर्गिक उत्पादनांमधून आदिवासी बांधवांचे उत्पन्न आणखी वाढू शकते. त्यामुळे या पारंपरिक उपजीविकेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button