ताज्या बातम्या

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण; ११ एप्रिलपर्यंत सत्रे

जळगाव (प्रतिनिधी): भारत सरकारच्या जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

मुंबई येथील जनगणना कार्य संचालनालयाच्या निर्देशानुसार ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण सत्र सुरू असून, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांसाठी एकूण १३७ फिल्ड ट्रेनर्सना यात सहभागी करून घेतले आहे. यामध्ये तालुका स्तरावरील १२० आणि जळगाव शहरातील १७ प्रशिक्षार्थींचा समावेश आहे.

या प्रशिक्षणासाठी पुणे येथील “यशदा” संस्थेत प्रशिक्षित अधिकारी मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षण बॅचप्रमाणे आयोजित करण्यात आले असून प्रत्येक गटात सुमारे ४० प्रशिक्षार्थींचा समावेश आहे.

दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रशिक्षण सत्रे घेतली जात आहेत. ६ ते ८ एप्रिलदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन आणि जिल्हा परिषद सभागृह येथे सत्रे पार पडली, तर ९ ते ११ एप्रिलदरम्यान अल्पबचत भवन तसेच जळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात पुढील प्रशिक्षण सुरू आहे.

प्रशिक्षणासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात (चोपडा), आर. के. डांगे (यावल नगर परिषद), ज्ञानेश्वर सपकाळे (बोदवड) आणि शासकीय तंत्रनिकेतन जळगावचे माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख हर्षल नेमाडे हे मास्टर ट्रेनर म्हणून मार्गदर्शन करत आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून जनगणना २०२७ च्या घरगणना टप्प्याची अंमलबजावणी अचूक आणि प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जनगणना शाखेकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button