
धरणगाव (प्रतिनिधी): जळगाव–धरणगाव मार्गावरील कोळगाव परिसरात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसटी बसने समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले. जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यापैकी काहींना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून धरणगावकडे जाणारी एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल २३७६) कोळगाव परिसरातून जात असताना चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालवाहू टेम्पोशी बसची समोरासमोर धडक झाली. धडकेचा जोर इतका होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या साहाय्याने सर्व जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात केशव कोडाजी गोराडे (५२), खंडूभाई भुरा सोलंकी (६९), सुभाष उगले पाटील (६५), गोपीनाथ ई. वाघ (७१), प्रभाकर भान (६५), किशोर बेसलकर (५७) आणि टेम्पो चालक गुलाब उखा पाटील (३९) हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय बडगुजर, संजय पाटील तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



