जळगावताज्या बातम्या

‘ड्रायस्पेल’चा फटका; बळीराजाची चिंता वाढली

दुबार पेरणीचे संकट; दमदार पावसाची प्रतीक्षा, शेतकऱ्यांमध्ये वाढली धास्ती

जळगाव (प्रतिनिधी): जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागांत पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दीर्घकाळ कोरडे वातावरण राहिल्यास काही भागांमध्ये दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची शक्यता कमी असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. व्यापक आणि सलग पावसासाठी अद्याप पोषक परिस्थिती निर्माण झालेली नसल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

पावसाचा खंड चिंतेचा

यंदाच्या हंगामात पेरणीनंतर आलेल्या पावसाच्या खंडामुळे मका, कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मातीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

आतापर्यंतची स्थिती

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही सरासरीच्या सुमारे ७८ टक्के असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. उर्वरित हंगामात चांगला पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद

तालुकाझालेला पाऊसटक्केवारी
जळगाव१२३ मिमी४८ टक्के
भुसावळ१२६ मिमी५६ टक्के
यावल१७४ मिमी७५ टक्के
रावेर२१७ मिमी९४ टक्के
मुक्ताईनगर२१० मिमी१०० टक्के
अमळनेर१५० मिमी७२ टक्के
चोपडा१६६ मिमी६९ टक्के
एरंडोल१५७ मिमी६७ टक्के
पारोळा२०७ मिमी९२ टक्के
चाळीसगाव२०४ मिमी७० टक्के
जामनेर१८५ मिमी६६ टक्के
पाचोरा२०३ मिमी७७ टक्के
भडगाव१९६ मिमी७७ टक्के
धरणगाव१९० मिमी६६ टक्के
बोदवड१३६ मिमी६१ टक्के

हवामान तज्ज्ञांचा अंदाज

तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असली तरी जिल्हाभर एकाचवेळी दमदार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन करण्यावर भर द्यावा आणि हवामान विभागाच्या पुढील अंदाजावर लक्ष ठेवावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button