अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन

जळगाव(प्रतिनिधी): जिल्ह्यातील मैट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१८–१९ पासून महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी निर्धारित पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे.
सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून नवीन व जुन्या विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित महाविद्यालयांनी तातडीने अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. तसेच सन २०२४–२५ या वर्षातील प्रलंबित व त्रुटीयुक्त अर्ज शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाविद्यालयांनी शासन निर्णयातील अटी व शर्तींनुसार पात्र अर्जांची तात्काळ पडताळणी करावी. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी मार्गदर्शक सूचना व नियमांचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्रुटींसाठी परत पाठविण्यात आलेले अर्ज सुधारणा करून पुन्हा सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे. पात्र असूनही शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित विद्यार्थी व महाविद्यालय जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, सन २०२४–२५ मधील ३७० आणि सन २०२५–२६ मधील १,५४८ अर्ज महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे अर्ज शासन निर्णयानुसार लवकरात लवकर निकाली काढावेत तसेच या योजनेची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



