ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाभू-अभिलेखवर आता जमिनीचे नकाशे ऑनलाइन उपलब्ध

२०२२ पासूनचे अभिलेख एकाच क्लिकवर; डिजिटल मोजणीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक

जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील नागरिकांना जमिनीसंबंधी सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २०२२ पासूनच्या जमीन मोजणीशी संबंधित नकाशे आता महाभू-अभिलेख प्रणालीवर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असून, ते नागरिकांना एका क्लिकवर पाहता आणि डाउनलोड करता येणार आहेत.

डिजिटल मोजणी प्रक्रियेला गती देत शासनाने नकाशे, मोजणी नोंदी आणि संबंधित अभिलेखांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता कमी होणार असून, आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन मिळविणे अधिक सोपे होईल.

नव्या सुविधेचे प्रमुख फायदे

१. नागरिकांना आवश्यक जमीन नकाशे ऑनलाइन पाहता व डाउनलोड करता येणार.

२. जमीन मोजणी, नकाशे आणि संबंधित नोंदींची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार.

३. कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार.

४. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वकील, सर्व्हेक्षक, वास्तुविशारद, बँका, वित्तीय संस्था तसेच विविध शासकीय विभागांना या सुविधेचा लाभ मिळणार.

महसूल विभागाच्या माहितीनुसार, डिजिटल मोजणी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेले ई-प्रमाणित (e-signed) नकाशे महाभू-अभिलेख पोर्टलवर उपलब्ध केले जात असून, त्यामुळे जमिनीसंबंधी विविध व्यवहार अधिक विश्वासार्ह आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button