नव्या पिढीने आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक “पालकमंत्री गुलाबराव पाटील”

जळगाव (प्रतिनिधी): जळगावमधील शिवतीर्थ मैदान येथे आयोजित खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन २०२६ चे भव्य उद्घाटन प्रादेशिक पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी नव्या पिढीने आधुनिक शेती व तंत्रज्ञानाकडे वळणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आज माहिती व तंत्रज्ञान सहज उपलब्ध असताना युवकांनी त्याचा उपयोग करून आधुनिक शेती व्यवसाय म्हणून स्वीकारावा आणि उत्पन्नदायी पिकांवर लक्ष द्यावे. त्यांनी ए आय (AI) तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही सांगितले.
या प्रदर्शनात विविध विभागीय अधिकारी, स्थानिक नेता, कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, आणि जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभावर पालकमंत्री यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त केला.
पालकमंत्री म्हणाले की, महिला बचतगटांनी आपल्या गावाची आर्थिक परिस्थिती परिवर्तनशील पद्धतीने बदलली आहे, त्यामुळे महिला ही केवळ घर सांभाळणाऱ्या नसून गावाच्या विकासात अग्रगण्य भूमिका बजावत आहेत. त्यांनी शेतकरी आणि पशुधन यांचे घनिष्ठ नाते महत्त्वाचे असल्याचे सांगितले आणि शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन केले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, जळगाव जिल्हा हे कृषीप्रधान जिल्हा असून या प्रदर्शनाचा उद्देश कृषी, पशुसंवर्धन व संस्कृती या तीन क्षेत्रांच्या संगमातून शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना व प्रशिक्षणाची माहिती देणे आहे. यावेळी विविध कृषि तंत्रज्ञान, मत्स्य संवर्धन, चर्चासत्रे, उद्योजकता विकास व महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
कार्यक्रमात कृषी निविष्ठा, अवजारे व साहित्य प्रदर्शन, शासकीय योजनांची माहिती स्टॉल, हस्तकला व गृहसजावटीच्या वस्तूंचे आकर्षक दालन, तसेच अहिराणी लोकपरंपरा, पारंपरिक लोककला व लोकनृत्ये, व विविध महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची जत्रा यासारख्या आकर्षक वैशिष्ट्यांनी शेतकरी व नागरिकांचे लक्ष वेधले.
हे प्रदर्शन दि. १ ते ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुलं राहणार असून, शेतकरी परिवार, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचे आयोजन समितीने आवाहन केले आहे.




