
विजयानंतर मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
रावेर (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर महाजन यांचे तांदलवाडी येथे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. गावात विविध ठिकाणी गुलाल उधळत आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
आमदार महाजन यांच्या स्वागतासाठी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाच्या उधळणीमुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
गावातील मंदिरांना भेट देऊन आमदार महाजन यांनी दर्शन घेतले तसेच ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी विजयाबद्दल आनंद व्यक्त करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक नागरिकांनी हा विजय विकासकामांना गती देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.



