जळगावताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा मोठा विजय

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी ५७७ मतांची भक्कम आघाडी घेत विजय मिळविला. जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे हा विजय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

या निवडणुकीत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रमुख समन्वयकाची भूमिका पार पाडली. महायुतीतील सर्व पक्षांमध्ये प्रभावी समन्वय साधत त्यांनी निवडणूक व्यवस्थापनाची धुरा सांभाळली. याशिवाय पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ तसेच विविध विधानसभा मतदारसंघांतील आमदारांनी प्रचार आणि मतदार संपर्कासाठी सक्रिय योगदान दिले.

महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज पाटील, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच भाजप व शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाभर राबविण्यात आलेल्या बैठका, संपर्क मोहिमा आणि समन्वय कार्यक्रमांमुळे महायुतीची संघटनात्मक ताकद अधिक प्रभावीपणे दिसून आली.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाभिमुख धोरणांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेला विश्वास या निकालातून स्पष्ट झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. विविध विकासकामे व जनकल्याणकारी योजनांना मिळालेला पाठिंबा या निकालातून अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.

नंदकिशोर महाजन यांना मिळालेली ५७७ मते ही केवळ विजयाची नोंद नसून महायुतीच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील विकासकामांना आणखी गती मिळेल, अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button