
५ फेब्रुवारीला मतदान, तर ७ फेब्रुवारीला निकाल
मुंबई/जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडेल. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेसोबतच संबंधित निवडणूक क्षेत्रांत आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम:
• निवडणूक अधिसूचना : १६ जानेवारी २०२६
• उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात : १६ जानेवारी २०२६
• अर्ज भरण्याची अंतिम मुदत : २१ जानेवारी २०२६
• मतदान : ५ फेब्रुवारी २०२६
• मतमोजणी व निकाल : ७ फेब्रुवारी २०२६
या जिल्ह्यांचा आहे समावेश
या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रक्रियेद्वारे जिल्हा परिषदांच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागा भरल्या जाणार आहेत.
राजकीय वातावरण तापणार
निवडणूक जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ताकारणात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने आता नवीन घोषणा, विकासकामे आणि प्रशासकीय निर्णयांवर निर्बंध आले आहेत. संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर ही निवडणूक प्रक्रिया राबवणार आहेत




