‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींची पुन्हा पडताळणी; अपात्र महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू

आकडेवारीतील तफावत दूर करण्यासाठी जिल्हानिहाय फेरतपासणी; प्रशासनाकडून लाभार्थी माहितीची छाननी
जळगाव | प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यभरातील लाखो महिलांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. मात्र लाभार्थी यादीत काही अपात्र महिलांचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुन्हा एकदा पडताळणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत विसंगती आढळल्याने प्रशासनाला नव्याने तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित विभागांकडून लाभार्थींची माहिती पडताळून आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा केली जाणार आहे.
कुटुंबाच्या उत्पन्नाची होणार तपासणी
शासनाने निश्चित केलेल्या अटी व निकषांनुसार लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, शासकीय नोकरी, आयकर भरणा तसेच इतर पात्रतेच्या अटींची पुन्हा एकदा छाननी केली जाणार आहे. निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक प्रशासनावर जबाबदारी
फेरपडताळणीची जबाबदारी जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे. लाभार्थ्यांची माहिती तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी संख्या
| तालुका | लाभार्थी |
|---|---|
| जळगाव | ७८५४८ |
| जामनेर | ५७७३६ |
| चाळीसगाव | ५०५२१ |
| रावेर | ६४९६७ |
| पाचोरा | ३९९३२ |
| चोपडा | ३७८२८ |
| भुसावळ | ३६९६४ |
| अमळनेर | ३३७५९ |
| यावल | ३३३०० |
| पारोळा | २८७७७ |
| मुक्ताईनगर | २३९९० |
| भडगाव | २०५७० |
| एरंडोल | १९८४३ |
| धरणगाव | १७७७७ |
| बोदवड | १३९७१ |




