
बालकलाकारांच्या कलाविष्काराने रसिक मंत्रमुग्ध
रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत आनंदात आणि उत्साहात पार पडले. या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित पालकांची व पाहुण्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पवार, सचिव मनीषा पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू पवार, रावेर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक रतिष सर, तसेच मनु सर, केऱ्हाळा येथील स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका जॉनसी मॅडम, उपमुख्याध्यापिका अनिता शिंदे, पर्यवेक्षिका निळे मॅडम आणि गणेश धांडे यांची उपस्थिती होती.
सोहळ्याची सुरुवात गुरुवर्य कै. राजाराम काशीराम पवार (आप्पा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहून करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा विविध ज्वलंत विषयांवर प्रकाश टाकणारी नाटके व नृत्य सादर केली. आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीस मोलाचे मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रवीण चौधरी, गजानन धनगर, गायत्री गोसावी, नूतन धनगर आणि प्रियंका महाजन यांनी केले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हा सांस्कृतिक सोहळा अतिशय देखण्या पद्धतीने पार पडला.



