जळगावताज्या बातम्या

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश

एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामसभा ठराव करणार – मंत्री आदिती तटकरे

जळगाव (प्रतिनिधी) : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. या निमित्ताने गाव व शहरांतील सर्व एकल महिलांना सन्मानपूर्वक कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात यावे, तसेच त्यांच्या सन्मानासाठी ग्रामसभांमध्ये विशेष ठराव मंजूर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासंदर्भात एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि आवश्यक उपाययोजनांवर मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिला व बालविकास विभाग महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. बालकांच्या जन्मनोंदणीत आईचे नाव अनिवार्यपणे नोंदविणे, तसेच समाजातील कालबाह्य रूढी-परंपरांविरोधात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

राज्यात ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच गाव किंवा शहरांमध्ये एकल महिलांना कोणत्याही प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव मंजूर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून, महिला सक्षमीकरण, रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. बचत गटांमध्ये सहभागी नसलेल्या महिलांना बचत गटांशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे एकल महिलांपर्यंत शासकीय योजनांची माहिती आणि लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल. तसेच समाजात त्यांना सन्मान, समानता आणि स्वाभिमानाने वागणूक मिळावी यासाठी जनजागृती होऊन त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button