आरोग्यक्राईमजळगावताज्या बातम्या

सहा वर्षीय बालकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू!

जळगाव तालुक्यातील सुजदे गावात घटना; रुग्णालयात आक्रोश

जळगाव (प्रतिनिधी) : खेळतांना विजेच्या शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील सुजदे गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

प्रेम नरेंद्र सोनवणे (वय ६) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव असून तो दुपारी घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता. त्याचवेळी शेडवरील मुख्य विद्युत तारांपैकी एक तार तुटल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये धोकादायक पद्धतीने विद्युत प्रवाह उतरला. प्रेम खेळता खेळता त्या पत्र्याच्या शेडच्या संपर्कात आला आणि त्याला जबरदस्त विजेचा धक्का बसला.

काही शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी तातडीने धाव घेऊन सर्वप्रथम विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर प्रेमला तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रेमचे वडील नरेंद्र सोनवणे हे शेती करतात, तर आई दीपाली सोनवणे गृहिणी आहेत. प्रेमला एक लहान भाऊ देखील आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याच्या अशा अकाली जाण्यामुळे प्रेमचे आई-वडील पूर्णपणे कोसळले आहेत. एका क्षुल्लक दुर्घटनेने हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button