
२८ ऑक्टोबर रोजी नशिराबाद टोल नाक्याजवळ झाला होता अपघात
जळगाव (प्रतिनिधी) : जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात साराबाई गणेश भोई (वय ४६ रा. पाडळसा ता. यावल) या महिला प्रवाशाचा दुर्दैवी मुत्यू झाला होता. ही घटना नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी बसचालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर आगाराची बस क्रमांक (एमएच-१४ बीटी-२३०६) ही जळगावकडून भुसावळकडे जात असताना बस नशिराबाद टोल नाक्याजवळ अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर भरधाव वेगात फुटले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरकटलेली बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली.
या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये साराबाई गणेश भोई या देखील बसमधून खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या. दुर्दैवाने, त्या बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा किरण गणेश भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक किशोर रामचंद्र जावळे रा. भुसावळ याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




