योजनाराष्ट्रीय-राज्यविकास

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत महाराष्ट्रातील बावीस शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश अर्बन ट्रान्सपोर्ट विभागाचे संचालक भानू प्रताप सिंह भदौरिया यांनी दिले.

महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा शहरनिहाय आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, अकोले, अमरावती, भिवंडी, चंद्रपूर, इचलकरंजी, धुळे, जळगाव, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा भाईदर, नागपूर, परभणी, नाशिक, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, नांदेड या महापालिकामार्फत   ही योजना राबविण्यात येत आहे. या आढावा बैठकीत योजनेच्या निधीचा वापर, निविदा प्रक्रिया, ई-बसेसच्या संचालनाची तयारी, चार्जिंग स्टेशन, बस डेपो तसेच आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागपूर, सोलापूर आणि ठाणे येथे ई-बस सेवा कार्यान्वित झाली असून, आगामी दोन महिन्यांत उर्वरित शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान बससेवा सुरू करण्यास सज्ज असलेल्या शहरांनी त्याबाबतचे पत्र सादर करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. त्यानुसार आवश्यक सामग्री व इतर बाबींच्या पुरवठ्याचा केंद्रस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.

ज्या शहरांमध्ये निविदा प्रक्रिया सुरू आहे, ती वेळेत पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी. तसेच प्रशासकीय व तांत्रिक अडचणींचे तातडीने निराकरण करून केंद्र व राज्यातील संबंधित यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधावा, असे निर्देश श्री. भानू प्रताप सिंह भदौरिया यांनी दिले.

ई-बस सेवा सुरळीतपणे सुरू होण्यासाठी चार्जिंग पायाभूत सुविधा आणि बस डेपोची तयारी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ई-बसेसचे संचालन सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध राहतील, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रकल्पाचे काम पूर्ण झालेल्या शहरांसाठी लवकरच विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत अंतिम बिल, उपयोगिता प्रमाणपत्र आणि प्रकल्पाच्या अंतिम कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी  आर्थिक व भौतिक प्रगती निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर दिला. पर्यावरणपूरक, आधुनिक आणि नागरिककेंद्रित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने पीएम ई-बस सेवा योजना महत्त्वपूर्ण असून, तिची प्रभावी आणि वेळबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही श्री. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button