
जळगाव (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्यात अवघ्या ४८ तासांत २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील एकूण साठा ६८.७७ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याची आवक कायम राहिल्यास तो लवकरच ७५ टक्क्यांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच नाशिक जिल्ह्यातील पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात २८ हजार क्युसेक वेगाने पाणी दाखल होत असून, त्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी धरणातील जलसाठा ४० टक्क्यांच्या आसपास होता, तर केवळ दोन दिवसांत त्यात मोठी वाढ होऊन २५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत तो ६८.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत धरणातील साठा ७५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रमुख धरणांची सद्यस्थिती
- गिरणा: गेल्या वर्षीचा जलसाठा ५१.५६ टक्के, यंदाचा ६८.७७ टक्के
- हातनूर: गेल्या वर्षी ४१.२९ टक्के, यंदा ५०.७१ टक्के
गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा आणि हातनूर या दोन्ही धरणांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
गिरणाने हातनूर आणि वाघूरलाही टाकले मागे
गिरणा धरणातील जलसाठा वेगाने वाढत असून, ६८.७७ टक्के जलसाठ्यासह ते हातनूर (५०.७१ टक्के) आणि वाघूर (५१.५६ टक्के) या प्रमुख धरणांपेक्षाही पुढे गेले आहे.
‘एल निनो’च्या प्रभावानंतर दिलासा
गेल्या वर्षी ‘एल निनो’ च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला नव्हता. मात्र, यंदा मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने जलसाठ्यात वेगाने वाढ होत असून, शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


