जळगावताज्या बातम्याधार्मिकसामाजिक

सामाजिक कल्याणकारी कार्याचा विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे : श्रद्धेय संत गोपाल चैतन्य महाराज

पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : आजच्या आधुनिक युगात पत्रकारिता करणे अधिक आव्हानात्मक बनले आहे. समाजात वाढत चाललेले व्यसन, राग, द्वेष, अहंकार आणि वैमनस्य यांसारख्या प्रवृत्तींमुळे माणसाची आध्यात्मिक विचारसरणी बदलत असून त्यातून अनेक अनुचित घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारितेमार्फत होत असून, संतांच्या सान्निध्यात सुरू असलेल्या मानवकल्याणाच्या कार्याला प्रसिद्धी देऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा पाल आश्रमाचे विद्यमान पदस्थ श्रद्धेय संत गोपाल चैतन्य महाराज यांनी केले.

ते दि. २६ जुलै रोजी वृंदावन धाम, पाल आश्रमात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, संतांच्या शिकवणीचा आणि अध्यात्मिक विचारांचा स्वीकार केल्यास व्यक्तीच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडून जीवन अधिक अर्थपूर्ण होऊ शकते.

यावेळी त्यांनी परमपूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, बापूजींनी अल्पवयात कठोर ध्यान, तपश्चर्या आणि साधनेद्वारे अध्यात्मिक सिद्धी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी समाजहितासाठी अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियान, सांदीपनी गुरुकुल, वृद्धाश्रम, भक्तीचा प्रचार-प्रसार, अखंड हरिनाम संकीर्तन, युवा योग शिबिरे, ध्यान केंद्र, आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण, सामाजिक ऐक्य आणि भक्तीसभांसारखे विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवून देशभरातील लाखो भाविकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या ब्रह्मलीन झाल्यानंतरही हे कार्य अखंडपणे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर मथुरा आश्रमाचे संत श्री हरिशरणानंदजी महाराज यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरूचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. येत्या २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पाल येथील वृंदावन धाम आश्रमात देशभरातून एक लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, परमपूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधीचे दर्शन, पादुका पूजन आणि श्रद्धेय बाबाजींच्या अमृतवाणीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जामनेर येथील चैतन्य धामाचे संत श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, पूज्य बापूजींनी केलेल्या महान समाजोपयोगी आणि अध्यात्मिक कार्याचा प्रसार व्यापक प्रमाणावर होणे आवश्यक आहे. या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. पत्रकारितेच्या माध्यमातून होत असलेल्या समाजसेवेचाही सन्मान व्हावा, हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार दिलीप वैद्य यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, समाजप्रबोधनातून सामाजिक सुधारणा घडवून आणता येते, असे मत व्यक्त केले. तर मंगलम पवार यांनी व्यक्तीने चुकीच्या प्रवृत्ती आणि विकारांचा त्याग करून अध्यात्मिक मार्ग स्वीकारल्यास जीवन अधिक उन्नत होऊ शकते, असे सांगितले.

या पत्रकार परिषदेला पाल, जळगाव, रावेर, झिरन्या आणि मध्यप्रदेशातील खरगोन परिसरातील शेकडो पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील राठोड यांनी केले, तर छोटूलाल चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button