जळगावताज्या बातम्या

अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या खासगी बस चालक-मालकांवर परवाना निलंबनाची कारवाई

– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जळगाव (प्रतिनिधी): राज्यात खासगी प्रवासी बसमधून कुरिअर पार्सल अथवा इतर अवैध मालवाहतूक केल्यास संबंधित चालक व मालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य शंकर गगटाप यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि सिद्धार्थ दंतोळे यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यात मालवाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी बस वर्गातील सर्व वाहनांची वायुवेग पथकांमार्फत नियमित तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाते. यापुढे वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व मालकांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ८६ नुसार थेट कारवाई करण्यात येणार आहे.

त्याअंतर्गत पहिल्या उल्लंघनासाठी ७ ते १० दिवस, दुसऱ्या उल्लंघनासाठी १० ते १५ दिवस, तिसऱ्या उल्लंघनासाठी १५ ते ३० दिवस परवाना निलंबित करण्यात येईल. चौथ्यांदा उल्लंघन झाल्यास संबंधित परवाना थेट रद्द करण्यात येईल.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई सुरू असून, वायुवेग पथकांमार्फत २०२५-२६ या कालावधीत मालवाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी बस वर्गातील ५,७२८ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४६१.७८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच १ एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत १,४५४ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ७८.१८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गांवरील पदपथांवर अनधिकृतपणे बस थांबवल्या जाऊ नयेत यासाठी संबंधित जागांच्या मालकी हक्काबाबत महानगरपालिकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरपालिकांना अधिकृत बसथांबे उभारण्याबाबतही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सुमारे ८,३०० बसेस उपलब्ध केल्यामुळे सध्या एसटी बसेसची कमतरता नाही. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विभागासाठी अतिरिक्त बसेसची मागणी केल्यास त्या उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button